प्रजाशाहीचा आवाज: हदगाव
हदगाव तालुक्यातील तळणी महसूल मंडळातील कोळी हे गाव तसे मोठे; पण येथील तलाठी कार्यालय इमारतीचा पत्ता अजूनही नाही. तलाठी सज्जाच्या इमारतीसाठी अद्याप जागाच मिळाली नसल्याचे समजते, मग हे बांधकाम सुरू होणार तरी केव्हा? गावातील तलाठी ‘कधी येतो, कुठे बसतो’ याचा थांगपत्ताच लागत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वर्षे लोटली, निधीही मंजूर; पण इमारत कधी पूर्ण होणार? बामणी फाटा, पळसा, मनाठा या परिसरातील तीन ते चार तलाठी कार्यालय इमारत बांधकामाकरिता दोन वर्षांपूर्वी निधी मंजूर झाला होता. दोन वर्षांपूर्वी गुत्तेदाराने बांधकामासाठी मोजमाप घेऊन आखणी देखील केली होती. पण दुर्दैवाने, दोन वर्षे लोटूनही यापैकी एकही इमारत पूर्ण झालेली नाही!यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना तलाठी कधी भेटणार, त्यांचे काम कधी होणार याची शाश्वती राहिली नाही. काम पडले की, लोकांना मोबाईलवर संपर्क साधून विचारणा करावी लागते.
नवीन तलाठी रुजू होऊनही ओळख पटेना! तीन महिन्यांपूर्वी कोळी गावात नवीन तलाठी रुजू झाले. परंतु, ग्रामस्थांची आणि त्यांची अजूनही ओळख झालेली नाही. ‘ते गावात कधी येतात आणि कधी जातात?’ हे कोणालाच माहीत होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तलाठी सज्जाचा अभाव.सध्या कोळी येथील तलाठी कधी ग्रामपंचायत कार्यालय तर कधी बसस्टॉपवर बसून आपली कामे पाहत असतात.हक्काचे कार्यालय नसल्यामुळे तलाठ्यांची ओळख गावामध्ये व्यवस्थित रुजलेली नाही.जर गावात तलाठी कार्यालय कार्यान्वित झाले, तर नागरिकांना इतरत्र तलाठ्यांचा शोध घेण्याची गरज पडणार नाही. जबाबदार कोण? जागा की प्रशासनाची उदासीनता?तलाठी सज्जा इमारतीचे बांधकाम कधी सुरू होणार, यासाठी अद्याप जागा उपलब्ध नसल्याची प्राथमिक माहिती आहे. निधी मंजूर होऊनही जर प्रशासनाला दोन वर्षांत बांधकामासाठी जागा निश्चित करता येत नसेल, तर यामागे प्रशासकीय दिरंगाई आहे की उदासीनता, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. शेतकऱ्यांची सातबारा, शासकीय योजनांची माहिती आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी तलाठी गावात नियमित भेटणे आवश्यक आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता कोळीच्या तलाठ्याला हक्काचा सज्जा मिळून ते नियमितपणे कामाला कधी लागणार, याचीच गावकऱ्यांना प्रतीक्षा आहे.या विषयावर स्थानिक प्रशासनाकडून कोणती कार्यवाही होते, याकडे कोळीच्या ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.





