जल जीवन मिशनच्या ‘हर घर जल’ योजनेचा बोजवारा! नागरिक तहानलेलेच; ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारावर संताप!
हदगाव: कृष्णा चौतमल
हदगाव/कोळी परिसर: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर जल’ पोहोचवण्याची योजना हदगाव तालुक्यातील कोळी परिसरात पूर्णपणे निष्काळजीपणाची शिकार झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून या नळ पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट अवस्थेत असल्याने येथील नागरिक पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही ठेकेदाराच्या ‘कासवगती’मुळे नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे.
सुरुवातीला वेगात सुरू झालेल्या या कामांना अचानक ‘माशी शिंकली’ आणि कामांची गती पूर्णपणे मंदावली. परिणामी, दोन वर्षांत पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रशासकीय वल्गना पोकळ ठरल्या आहेत. ठेकेदार कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि कामचुकारपणामुळे ही योजना लोकांच्या सोयीऐवजी त्रासाचे कारण ठरली आहे.
रस्ते झाले चाळण, पाणी मात्र मिळेना!
योजनेच्या पाईपलाईनसाठी गावागावांतील चांगले रस्ते जागोजागी खोदण्यात आले. यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. नागरिकांनी ओरड केल्यानंतर संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने हे रस्ते केवळ ‘थातुरमातुर’ पद्धतीने दुरुस्त करून दिले. मात्र, रस्त्यांच्या दुरुस्तीचा हा देखावा करत असताना योजनेचे मुख्य काम मात्र आजही अपूर्णच आहे.
नागरिक संतप्त होऊन विचारत आहेत की, कोट्यवधी रुपये खर्चून सुरू झालेली ही नळ योजना नेमकी पूर्ण कधी होणार? पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी असलेली आमची प्रतीक्षा कधी संपणार?
कोळी परिसरातील नागरिकांचा संताप:
“पाईपलाईन टाकण्यासाठी आमचे चांगले रस्ते खोदले, त्यांची डागडुजीही नीट केली नाही. आता दोन-तीन वर्षांनंतरही नळातून पाणी आले नाही, तर या योजनेचा आम्हाला काय उपयोग? ठेकेदारावर कारवाई करून तातडीने काम पूर्ण करण्याची गरज आहे.”
पाणी मिळण्याची प्रतीक्षा कधी संपणार?
पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत गरजेसाठी असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेची ही अवस्था पाहता, स्थानिक प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार स्पष्टपणे दिसून येतो. ‘हर घर जल’ हे केवळ एक स्वप्न बनले असून, नागरिकांना आजही शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
तातडीने या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करावी, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलनाचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.






