नांदेड प्रतिनिधी: कुणाल भुरे
आपल्या मुलाला गमावल्यानंतर एका आईने दाखवलेला संघर्ष, न्यायासाठीची तिची तीव्र मागणी आणि त्याचवेळी एका नवीन नात्याला दिलेला आधार या भावूक कहाणीने सगळ्यांनाच हेलावून सोडले आहे. आपल्या दिवंगत मुलाचे नाव घेत ती आता दुसऱ्या मुलीला मुलाचे स्थान देत आहे. मुलाच्या मारेकऱ्यांसाठी तिने थेट फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.
पोलीस स्टेशनला घडला भावनिक प्रसंग
घटनेच्या दिवशी नाही, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आई आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली होती, तेव्हा तिची भेट ‘आचल’ नामक मुलीशी झाली. हा प्रसंग आईसाठी अत्यंत भावनिक होता.
आईने सांगितले की, “आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेलो होतो तेव्हा हाचल तिथे भेटली आम्हाला. मी पोलीसच्या ताब्यात असतानाही तिन माझ्या गळ्याला पडली आणि ती म्हणाली की मी तुमच्या सोबतच येईल आणि मी तिला माझ्या सोबत घेऊन आली.”
‘आचल’मध्ये दिसला ‘सक्षम’
आचलचे घरदार सोडून या मातेकडे येणे आणि आईने तिला दिलेला आधार हा या कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. स्वतःच्या मुलावर केलेल्या प्रेमाप्रमाणेच आचलवर प्रेम करणार असल्याचे आईने सांगितले. तिने स्पष्ट केले की, ती आचला केवळ मुलगी मानणार नाही, तर तिला मुलाचाच अधिकार देईल.
याविषयी बोलताना आई अत्यंत भावूक झाली. त्या म्हणाल्या, “जस मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करेल आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही, माझा सक्षम मानल, तिला मुलाचाच अधिकार देईल.”
एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हेही स्पष्ट केले की, त्या आचलमध्ये आपला दिवंगत पुत्र सक्षम यांना पाहतात. “मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करेल. आयुष्यभर प्रेम करेल, जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करेल. तिन माझी साथ नाही सोडली तर मी तिची शेवटपर्यंत साथ नाही सोडणार,” अशा शब्दांत त्यांनी आपले वचन दिले.
गुणवंत सदावर्ते यांच्या ऑफरवर आईची मागणी
या संपूर्ण प्रकरणात आईच्या बाजूने उभे राहण्याची तयारी वकील गुणवंत सदावर्ते यांनी दर्शविली होती. त्यांनी सांगितले होते की, आईने मागणी केल्यास ते स्वतः लढायला तयार आहेत. यावर आईने आपली अंतिम आणि कठोर मागणी स्पष्ट केली आहे.
न्यायासाठी लढताना त्यांची मागणी काय आहे, या प्रश्नावर आईने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांची एकच मागणी आहे:
“माझी मागणी आहे माझ्या लेकांना ज्यांनी ज्यांनी मारले, त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे आणि ती त्यांनी दिलीच पाहिजे.”
मुलाच्या मारेकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा व्हावी यावर त्या ठाम आहेत. एकीकडे आचलला मायेचा आधार देत आणि दुसरीकडे न्यायासाठी कठोर लढा देत, या मातेने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.






