कळमनुरी तालुक्यातील बऊर गाव ठरले ‘फॉर्मर आयडी’ असलेले पहिले गाव

गायरान जमिनीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटल्याने शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा; वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार.
कळमनुरी: कळमनुरी तालुक्यातील बऊर (गाव) येथील गायरान जमिनीच्या प्रश्नावर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला असून, शासनाने येथील जमिनीतील क्षेत्रफळांना आकारणी देऊन ‘पोट खराब’ मधून ‘वहीती क्षेत्र’ म्हणून अधिकृत केले आहे. त्यामुळे बऊर हे जिल्ह्यातील ‘फॉर्मर आयडी’ असलेले पहिले गाव ठरले आहे. या यशामुळे येथील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या सर्व सुविधांचे दरवाजे खुले झाले आहेत. या महत्त्वपूर्ण कामासाठी सतत पाठपुरावा केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांचा शेतकऱ्यांनी सत्कार करून आभार मानले.
काय होता नेमका प्रश्न?
कळमनुरी तालुक्यातील बऊर येथील अनेक शेतकऱ्यांकडे शासनाने वाटप केलेल्या जमिनी होत्या. परंतु, या जमिनी गेली अनेक वर्षे ‘पोट खराब’ आणि ‘भोगवटदार वर्ग-२’ (भोगवतदार 02) मध्ये क्षेत्रांतर्गत समाविष्ट होत्या. यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक नुकसान भरपाई, फॉर्मर आयडी आणि शासनाच्या इतर कोणत्याही सोई-सुविधा व योजनांचा लाभ मिळत नव्हता. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता.
कांबळे यांच्या प्रयत्नांना यश
शेतकऱ्यांनी आपली ही अडचण वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालयात ‘जनता दरबारा’त मांडली. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी गेली एक वर्षापासून या अडचणीचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, शासनाने आता या जमिनीतील क्षेत्राला अधिकृत आकारणी दिली आहे आणि ‘पोट खराब’ मधून ‘वहीती क्षेत्र’ म्हणून त्यांची नोंद केली आहे. यामुळे आता बऊर गावातील शेतकरी शासनाच्या सर्व सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊ शकणार आहेत.
मालकी हक्काची प्रक्रिया सुरू
एवढेच नव्हे तर, या जमिनी ‘भोगवटदार वर्ग-२’ मधून ‘भोगवटदार वर्ग-१’ (भोगवतदार 01) मध्ये घेण्याची प्रक्रिया आणि या शेतकऱ्यांना या जमिनीचे कायमस्वरूपी मालक बनवण्याची प्रक्रिया देखील सध्या सुरू आहे. हा प्रश्नही लवकरच कायमचा सुटून जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
इतर शेतकऱ्यांसाठी आवाहन
बऊर गावातील शेतकऱ्यांनी राजू कांबळे यांचे आभार मानून सत्कार केला आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली. दरम्यान, राजू कांबळे यांनी कळमनुरी तालुक्यातील इतर गायरान जमीनधारक शेतकऱ्यांना विनंतीपूर्वक आवाहन केले आहे की, त्यांनी वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपला प्रश्न ‘जनता दरबारी’ घेऊन यावा, जेणेकरून त्यांच्याही समस्या कायमस्वरूपी सुटू शकतील. बऊर गावातील यशामुळे आता इतर शेतकऱ्यांसाठीही आशेचा किरण निर्माण झाला आहे.





