
PES voice – 073 । व्यक्ती नाही, कायदा सर्वोच्च!
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे “व्यक्ती नाही, तर कायदा सर्वोच्च.”
डॉ. एस. पी. गायकवाड यांनी आपले आयुष्य धम्मकार्याला अर्पण केले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपसोबत राजकीय युती केली, आणि आद. आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत (भाजप सोबत सत्तेत असलेल्या शिंदे सेनेसोबत नुकतीच युती केली आहे) – या गोष्टींच्या आधारावर त्यांचा विरोध किंवा समर्थन करणे हा न्याय्य मार्ग नाही.
उद्याला, जर कायद्याच्या कसोटीवर आणि न्यायालयीन प्रक्रियेनुसार रामदास आठवले हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कायदेशीर अध्यक्ष ठरले, तर ते पद आपण मान्य करणे भागच आहे. कारण ते भाजपसोबत गेलेत, या राजकीय कारणावरून त्यांचा विरोध करणे येथे योग्य ठरत नाही. बाबासाहेबांनी दिलेला भारतीय संविधान आणि कायदा हा आपल्या सर्वांपेक्षा व सर्व मतभेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. तसेच डॉ. एस.पी. गायकवाड किंवा आद. आनंदराज आंबेडकर जरी अध्यक्ष झाले तरी ते आपल्या सर्वांना मान्य करणे भाग आहे.
आपण विसरू नये की, बाबासाहेबांचे स्वप्न हे व्यक्तिवाद, गटबाजी किंवा राजकीय निष्ठांवर चालणारा समाज नव्हते. त्यांनी दिलेल्या कायद्याच्या अधीन राहून, संस्थेचा कारभार पारदर्शक, न्याय्य आणि सर्वसमावेशक असावेत हा त्यांचा उद्देश होता.
म्हणूनच आमची लढाई कुणाच्या बाजूने किंवा कुणाच्या विरोधात नाही, तर कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आहे. जेव्हा कायदा निष्पक्षपणे लागू होईल, तेव्हा व्यक्ती बदलतील पण संस्थेची तत्त्वे टिकून राहतील. जेव्हा कायदा निष्पक्षपणे आणि काटेकोरपणे लागू होतो, तेव्हा कोणत्याही गटाला विशेष लाभ किंवा अन्याय होत नाही. त्यामुळे व्यक्तिगत मतभेद, राजकीय निष्ठा किंवा भावनिक कल हा बाजूला ठेवून, आपण सर्वांनी “कायदा सर्वोच्च” ही भूमिका स्वीकारली पाहिजे. विरोधही कायद्याच्या चौकटीत आणि समर्थनही तर्क-पुराव्यांवर आधारित असले पाहिजे. अन्यथा, संस्थेच्या भल्यासाठी लढा देण्याऐवजी, आपण नुसतेच गटबाजीच्या चक्रात अडकून पडू. व्यक्ती बदलल्या तरी कायदा सर्वोच्च राहील हाच आपला मार्ग, हाच आपला लढा





