शेतकऱ्यांचा वाली! औंढा तालुक्यातील खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेना (उ. बा ठा.) मैदानात माऊली झटे यांच्या नेतृत्वात निवेदन! तात्काळ कार्यवाही करा अन्यथा; रास्ता रोको आंदोलन करू
प्रजाशाहीचा आवाज विशेष प्रतिनिधी: औंढा नागनाथ
औंढा नागनाथ: रब्बी हंगामात पिकांनी कंबर कसली असताना, औंढा तालुक्यातील रामेश्वर, रूपूर आणि साळणा या प्रमुख सबस्टेशन्स अंतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतातील विद्युत पुरवठा ( वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. पिकांच्या वाढीसाठी पाण्याची नितांत गरज असताना, वीज नसल्यामुळे शेतकरी नवीनच समस्येच्या खाईत लोटले गेले आहेत.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि वीज वितरण कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता औंढा येथील तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.
पाण्याची समस्या, वाढीव खर्च… शेतकऱ्यांची व्यथा!
औंढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेतली जातात. मात्र, वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाहीये. यामुळे:
पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. नियमित पाणी मिळत नसल्याने रब्बी पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
तांत्रिक उपाययोजनांची ‘धडाकेबाज’ मागणी!
निवेदनात, विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी तातडीने काही महत्त्वाच्या तांत्रिक उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाने केली आहे:
कुरुंदा येथील ३३ के.व्ही. लाईनवर औंढा टी पॉईंट आणि धार फाटा येथे ३३ के.व्ही. आयसुलेटर (Isolator) बसवावे.३३ के.व्ही. उपकेंद्र साळणा येथे ५ एम.व्ही.ए. (MVA) क्षमतेचा नवीन ट्रान्सफार्मर बसवावा अनखळी पोटा येथे ११ के.व्ही. कपॅसिटर (Capacitor) बसवावे.अनखळी फीडरला जोडण्यासाठी उर्वरित गावे समाविष्ट करावीत. जिंतूर (Jintur) व भोगाव (Bhogav) येथून होणारा वारंवार खंडित पुरवठा टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.
साळणा येथील एचडीटी (HDT) प्रणाली तातडीने सुरू करावी दौडगाव येथील जुने व जीर्ण झालेले लोखंडी पोल (Poles) त्वरित बदलावेत.
लोकशाही मार्गाने ‘जवाब’ देणार!
जर दिनांक १८ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या या न्याय आणि आवश्यक मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा खणखणीत इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे, बबनराव इघारे, सुधाकर मगर, तुकाराम गायकवाड, माऊली मगर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रशासनाने शेतकऱ्यांची ही ‘सणसणीत’ मागणी गांभीर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना करावी, अशी तीव्र प्रतिक्रिया सध्या औंढा तालुक्यात उमटत आहे.






